मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ता सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. त्याचबरोबर मुनमुन दत्तानं मातृत्वाबद्दलही तिचं मत व्यक्त केलं आहे.
मुनमुन दत्ताला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. या मालिकेमध्ये तिनं साकारलेली ‘बबिता’ची भूमिका चांगलीच गाजली. अभिनेत्रीला प्रेक्षक ‘बबिता’ म्हणूनच ओळखतात. मुनमुन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते. मात्र, अभिनेत्री लग्न कधी करणार? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. मुनमुन स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अशातच आता रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनमुनने तिच्या लग्नाबद्दल आणि मातृत्वाच्या विचारांबद्दल भाष्य केलं आहे.
मातृत्वाबद्दल काय म्हणाली मुनमुन दत्ता?
मुलाखतीदरम्यान मुनमुनला तिच्या ग्लोइंग स्कीनबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी लग्न केलं नाहीये आणि मला मुलं नाहीयेत, त्यामुळे त्याचा ताण नाहीये म्हणून कदाचित माझी त्वचा इतकी छान आहे’ याचदरम्यान अभिनेत्रीला मातृत्वाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मुनमुन म्हणाली, ‘मला आई व्हायचं नाहीये आणि या बाबतीत माझे विचार स्पष्ट आहेत. कोणीही माझ्याबद्दल बोललं तरी मला काही फरक पडत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. हे माझं मत आहे.’
