उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांची थेट नासाला भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आणि त्यांना तिथे पाठवण्यात आलं होतं.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज दुखद निधन झालं आहे. अजित पवार हे अभाळाएवढी उंची असलेले बडे नेते होते. ते शेतकरी, कष्टकरी समजासाठी प्रचंड प्रेम आणि जिव्हाळा असलेले नेतृत्व होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर अजित पवार एकदा जळगावात गेले होते. त्यावेळी अजित पवार यांनी प्रोटोकॉलचा विचार न करता ते शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली होती. शेतात काम करणाऱ्या महिलांसोबत संवाद साधला होता. अजित पवार यांनी खूप आपूलकीने तिथल्या शेतकऱ्यांसोबत बातचित केली होती. अजित पवार जितके शिस्तप्रिय होते तितकेच ते संवेदनशील देखील होते. अजित पवार यांच्या संवेदनशील स्वभावाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेतील शालेय विद्यार्थ्यांना नासा संस्थेला भेट देण्यासाठी पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे शेतकरी, गोरगरीब मजूर यांच्या हुशार मुलांची यासाठी निवड करण्यात आली होती. एका चिमुकलीने अजित पवार यांची मुलाखत घेतली. fearless_annada अशा इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत चिमुकली अजित पवार यांना त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर अजित पवार यांनी खूप सुंदर उत्तर दिलं.
अजित पवार काय म्हणाले?
“जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीडीसी असतं, त्यामध्ये आपण जिल्ह्यातील वेगवेगळे विकासकाम करु शकतो. नासा एक जागतिक पातळीवरची महत्त्वाची संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारी गोरगरिबाच्या हुशार मुलांचं आम्ही बुद्धीमत्ता पाहून त्यांचं सिलेक्शन करतो आणि पाठवतो. त्यांना तिथे गेल्यानंतर नासा म्हणजे काय, जगात काय चालतं, कशाप्रकारे कामकाज चालतं याबाबत माहिती मिळते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो. तो आत्मविश्वास येण्याकरता आपण असं केलं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“नुसतं शेतकरी नाही. काही जणांची शेती नाही, पण मोलमजुरी करतात. त्यांची मुलं हुशार असतात. अशा गोरगरिबांची मुलं जे कधीही विद्यार्थी दशेत असताना विदेशात गेले नाहीत त्या मुलांना तिथे पाठवायचं, त्यांनी त्यांच्या बुद्धिमतेचा चांगल्या प्रकारे वापर केला तर उद्या ते जबाबदार नागरीक होऊ शकतात. शास्त्रज्ञ होऊ शकतात”, असं अजित दादा म्हणाले होते.
