Iran US Israel War: इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल संघर्ष सुरु होऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्याप तरी युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. अशा परिस्थितीत इराणनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
तेहरान: अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध लढत असलेल्या इराणनं ऐन युद्धात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेजारी देशांवरील हल्ले रोखण्याचा निर्णय इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी जाहीर केला आहे. त्यांनी देशाला टिव्हीच्या माध्यमातून संबोधित केला. या भाषणात त्यांनी शेजारी देशांवरील हल्ले थांबवण्याचा निर्णय घोषित केला. पेजेश्कियान यांनी शेजारी देशांची माफी मागितली. अन्य देशांवर आक्रमक करण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
देशाला संबोधित करताना अध्यक्ष पेजेश्कियान यांनी शांततेसोबतच सार्वभौमत्वाचाही उल्लेख केला. इराणनं बिनशर्त शरणागती पत्करावी अशा शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. ट्रम्प यांना पेजेश्कियान यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. ‘आम्ही बिनशर्त शरणागती पत्करु असं स्वप्न काही जण पाहात आहेत. त्यांनी त्याचं स्वप्न कबरीपर्यंत स्वत:सोबत घेऊन जावं,’ अशा शब्दांत पेजेश्कियान यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
आठवडाभरापासून इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका असा संघर्ष सुरु आहे. अमेरिका, इस्रायल यांच्याकडून इराणवर सातत्यानं हल्ले सुरु आहेत. प्रत्युत्तरात इराणनं आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या नौदल आणि हवाई तळांना लक्ष्य केलं आहे. कतार, सौदी अरेबिया, ओमाण, बहारिन, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमधील अमेरिकेच्या तळांवर इराणनं हल्ले केल्यानं युद्धाची व्याप्ती मध्य पूर्वेत पसरली आहे..
पेजेश्कियान यांनी त्यांच्या भाषणात शेजारी देशांचा विशेष उल्लेख केला. ‘इराण एक शांतताप्रिय देश आहे. आम्ही शेजारी देशांवरील हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेची स्थिरता लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला आहे,’ असं पेजेश्कियान म्हणाले. गेल्या आठवड्याभरातील क्षेपणास्त्र हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल होत असलेल्या कारवायांमुळे इराणवर बराच दबाव आहे. त्यामुळेच इराणनं एकाएकी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
देशाला संबोधित करण्याआधी पेजेश्कियान यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद साधला. आपण मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्याच्या आणि शत्रुत्व संपवण्याच्या बाजूनं असल्याचं पुतीन यांनी पेजेश्कियान यांना सांगितलं. ताकदीच्या बळावर कोणतीही समस्या सुटणार नाही. तर संवादाच्या मार्गातूनच मार्ग निघेल, यावर पुतीन यांनी विशेष भर दिला.
