Jamie lever On Jesse Lever Tumor : जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेमी लिव्हरला वयाच्या १२व्या वर्षी ट्युमर झालेला. त्याबद्दल बहिण जेमी लिव्हरनं भाष्य केलं आहे.
07.03.26,मुंबई – जॉनी लिव्हर हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांपैकी एक आहेत. नेहमी हसणारे आणि इतरांना हसवणाऱ्या जॉनी लिव्हर यांच्या आयुष्यात एक काळ असा होता ज्यावेळी त्यांच्यावर मोठं संकट आलेलं. जॉनी लिव्हर यांचा मुलगा जेसी लिव्हरला वयाच्या १२व्या वर्षी ट्युमरचं निदान झालेलं. अशातच आता जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हरनं या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.
जेसी लिव्हरला झालेलं ब्रेन ट्युमरचं निदान
जेमी लिव्हरनं नुकतीच ‘विकी लालवानी’ यांना मुलाखत दिली. यादरम्यान जेमीला जेसीच्या आजारपणाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर जेमी लिव्हर म्हणाली की, ‘जेसी १२ वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या मानेमध्ये ट्युमर झालेला आणि तेव्हा तो शाळेत होता. सुरुवातीला समजलं नाही आणि परिस्थिती हाताबाहेर जात होती. आम्ही एकाच शाळेत होतो. त्यामुळे जेव्हा त्याचं मित्रांसोबत भांडण व्हायचं, त्यावेळी त्याला काही झालं नाही ना! हे बघायला मी धावत जायचे. त्यानंतर त्याची सर्जरी झाली. तेव्हापासून आमचं आयुष्य बदललं.’
‘आम्ही आधी देवाला मानत होतो, पण त्यानंतर देवावरचा विश्वास आणखीन वाढला. त्याचदरम्यान माझ्या वडिलांना दारूचं व्यसन लागलं, ते जास्तवेळ बाहेर असायचे त्यामुळे आमच्यासोबत वेळ घालवत नव्हते. खूप कठीण काळ होता तो.’ असं जेमी पुढे म्हणाली.
जेसीनं सांगितला प्रसंग
जेसीच्या सर्जरीबद्दल सांगताना जेमी म्हणाली की, ‘जेसीची मुंबईमध्ये एक सर्जरी झालेली पण ती फेल गेली. त्यानंतर दुसरी मोठी सर्जरी अमेरिकेत झाली. या सगळ्याला दोन वर्ष गेली. जेव्हा पहिली सर्जरी फेल झाली त्यावेळी आम्ही देवाकडे प्रार्थना केली. त्यानंतर आम्ही असंच सुट्ट्यांमध्ये अमेरिकेला गेलेलो आणि तिथे चर्चमध्ये एका फादरने भावाला पाहिलं आणि त्यांनी तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्जरी करण्याचा सल्ला दिला. कदाचित तेसुद्धा देवाच्या रुपात आले असतील. त्यानंतर मग टेस्ट झाल्या आणि त्याची सर्जरी झाली.’
